सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी सोलापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध सामाजिक संस्था संघटनेच्या प्रमुख व शिवभक्तांनी यांनी अभिवादन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने घरात राहूनच शिवजयंती साजरी करण्याचे यावेळी मान्यवरांनी व प्रशासनाने आवाहन केले.
अभिवादन करण्यासाठी मोजक्याच शिवभक्तांना प्रवेश-
वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोजक्याच शिवभक्तांना प्रवेश देण्यात आला होता. सोलापूर बस स्थानक येथील शिवाजी चौकात रात्री बारा वाजल्यापासून अभिवादन करण्यासाठी शिवभक्त दाखल होत होते. गर्दी वाढू नये आणि संसर्ग होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी बॅरिगेट लावून मोजक्याच मावळ्यांना प्रवेश दिला होता.
राजकीय कार्यक्रमांवर देखील कडक नियम लागू करावे- माऊली पवार
सकल मराठा समाजाचे समनव्यक माऊली पवार यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला मिरवणुकीस परवानगी नाकारली. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या मोजक्याच शिवभक्तांना प्रवेश दिला. राजकिय कार्यक्रमांना मोठी गर्दी असते. या राजकीय पार्ट्यांना देखील कोरोना नियमावलीची सक्ती करण्यात यावी, असे माऊली पवार यांनी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा- राज्याचे मंत्री कोरोनाच्या कचाट्यात!