सोलापूर - चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप ( babanrao gholap ) यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली (ink thrown on former minister) आहे. रविवारी (दि. 21) सोलापुरातील एका सभेतील व्यासपीठावर त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली आहे.
मृत भानुदास शिंदे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे अशोक आणि सुरेखा लांबतुरे यांना पाठिशी घालणाता आल्याचा आरोप माजी मंत्री घोलप यांच्यावर मृत भानुदास शिंदेचे यांच्या कुटुंबीयांनी यावेळी केला. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे ( MLA Praniti Shinde ), नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका संगीता जाधव यांसह आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
काय आहे भानुदास शिंदे आत्महत्या प्रकरण ..?
मार्डी येथील यमाई देवी आश्रम शाळेमधील चेअरमन अशोक लांबतुरे आणि सुरेखा लांबतुरे यांनी केलेला भ्रष्टाचार आश्रम शाळेचे तत्कालीन संचालक मृत भानुदास शिंदे यांनी बाहेर काढला होता. त्याचा राग मनात धरून अशोक लांबतुरे आणि त्यांच्या पत्नी सुरेखा लांबतुरे हे त्यांना वारंवार मानसिक आणि आर्थिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आत्महत्या केली होती, असे आरोप शिंदे कुटुंबीयांनी केले आहेत.
बबनराव घोलप यांच्या अंगावर का फेकली शाई ..?
आत्महत्येच्या घटनेनंतर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिंदे कुटुंबीयांना विश्वासात घेत न्याय देतो, अशी ग्वाही देऊन अशोक लांबतुरे आणि सुरेखा लांबतुरे यांना संघटनेतून काढून टाकले होते. जोपर्यंत शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांना संघटनेत घेणार नाही, असा शब्द दिला होता. तो शब्द खोटा ठरवत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबाला फसवून या दोघांना संघटनेत पुन्हा घेऊन सोलापुरात कार्यक्रम करण्यासाठी आले, असे म्हणत माजी मंत्री बबनराव घोलप यांवर शाई फेकण्यात आली. मृत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबीयांनी निषेध केला तर त्यांचे चिरंजीव धनु शिंदे यांनी व्यासपीठावर जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न करत त्यांच्या नावे निषेधाच्या घोषणा दिल्या.
...तर भविष्यात घोलप यांचे कपडे फाडणार
न्याय देतो म्हणत माजी मंत्री घोलप यांनी फसवणूक केली आहे. यापुढे त्यांनी लांबतुरे पती-पत्नीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला व सोलापुरात आले त्यांचे कपडे फाडू, असा इशाराही शिंदे यांचे चिरंजीव धनु शिंदे यांनी दिला आहे.
हे ही वाचा - लग्न मुहूर्तांतसुद्धा वरातीच्या घोड्यांची परवड सुरूच; सांगा जगायचं कसं..?