सोलापूर- सोलापूर जिल्हा शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले. यावेळी शिवसैनिक व पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी प्रस्तिकात्मक पुतळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना ही झटापट झाली. शिवसेना नगरसेवक गणेश वानकर, दिलीप माने, प्रकाश वानकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेले होते. रावसाहेब दानवे मुर्दाबाद, भाजप सरकारचा निषेध असो, शिवसेना पक्षाचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक गणेश वानकर यांनी अतिशय छुप्या पद्धतीने रावसाहेब दानवे यांचा पुतळा आणून लपवून ठेवला होता. पोलिसांच्या नजरेस हा पुतळा आल्याबरोबर त्यांनी तो प्रतिकात्मक पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यामधून शिवसैनिक आणि पोलिसांसोबत झटापट झाली. देशभरातील जनतेला भगवान रामचे नाव घेत, राम मंदिर बांधू असे सांगून हे केंद्र सरकार निवडून आलेलं आहे. रामाचा नाव घेऊन आलेलं सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप शिवसेना नेते प्रकाश वानकर यांनी यावेळी करत भाजपावर टीका केली.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानचा पाठिंबा असल्याबाबत वक्तव्य केल्याने त्यांचा देशभरात निषेध केला जात आहे. सोलापूर मध्ये देखील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा- केरळमध्ये कोरोना लस मोफत मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा