सोलापूर - पती पत्नीच्या भांडणाचे रुपांतर तुफान दगडफेकीत झाले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास मौलाली चौक परिसरात दगडफेक झाली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली.पत्नीला नीट नांदव या कारणावरून घरगुती भांडण सुरू होते. याचे रुपांतर मोठया दगडफेकीत झाले आहे. रस्त्यावर दगड व विटाचा खच पडला होता. रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती.
बुधवारी दुपारच्या सुमारास मौलाली चौक परिसरात पत्नीला नीट नांदवत नाही या कारणाने दोन कुटुंबामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू होती. या तक्रारीचे स्वरूप जोराच्या भांडणात होत असताना आजूबाजूच्या नागरिकांनी या दोन्ही कुटुंबाला तुमची भांडणे घरात करा, आजूबाजूच्या व शेजारच्या लोकांना त्रास होत आहे. असे सांगितले असता, दोन्ही कुटुंब एक होऊन आजूबाजूच्या शेजाऱ्यांना भांडू लागले. शेजारच्या लोकांनी देखील जोराचे भांडण सुरू केले. यावरून वाद उफाळत गेला व तुफान दगफेकीस सुरुवात झाली.
लॉकडाऊन असल्याने सर्वत्र शांतता होती. दोन कुटुंबाच्या भांडणातून दगडफेक सुरू झाल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. सोशल मीडियावरून ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. वेगवेगळ्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. जातीय दंगल अशी देखील अफवा पसरवली जात होती.
सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन पाहणी करून दगडफेक करणाऱयांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत, लॉकडाऊन आहे घरात बसा, बाहेर निघू नका असे पोलिसांनी सांगितले.
दगडफेकीची तिसरी घटना
सोलापुरात दगडफेकीची ही गेल्या एक महिन्यातली तिसरी घटना आहे. यापूर्वी पैशाच्या कारणावरून नई जिंदगी येथे दगडफेक झाली होती. याचा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पैशाच्या कारणावरून दोन गटात दगडफेक झाली होती. त्यानंतर बुधवारी दोन कुटुंबाच्या भांडणातून दगडफेक झाली आहे.