सोलापूर - जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या महामार्ग पोलिसांनी जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत महार्गावर धावणाऱ्या विविध वाहनांवर कारवाईचा बडगा उचलत 75 लाखांचा दंड वसूल केला आहे. जनजागृती करत वाहनधारकांना समज देत महामार्गवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आय. सय्यद यांनी दिली.
ट्रॅफिक पोलीस दलात राज्य सरकारने इंटरसेप्टर दर्जाचे दोन चार चाकी वाहन दिले आहे. ही दोन्ही वाहने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या मदतीने वाहनांचा वेग आणि ड्रंक अँड ड्राईव्ह यावर नियंत्रण आणले जात आहे. याला इंटरसेप्टर कार देखील म्हणतात. या इंटरसेप्टर कारमध्ये स्पीड गन देखील उपलब्ध आहे. जेणेकरून चार चाकी वाहन धारकाला ताशी 90 किमीच्या वेगापेक्षा अधिक जोरात वाहन हाकता येत नाही. अगर वाहनाचे वेग 90 प्रति तास पेक्षा अधिक असेल तर त्याचा पाठलाग करून महामार्ग पोलीस त्यावर ऑनलाईन दंड ठोठावत आहेत.
महामार्ग पोलिसानी जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 दरम्यान 15 हजार 512 केसेस केल्या आहेत. यामध्ये विना हेल्मेट, मोबाईलवर बोलणे, ब्लॅक फिल्म, नेम कटिंग, धोकादायक माल वाहतूक, नो एंट्री, चुकीचे पार्किंग, जड वाहतूक चुकीच्या दिशेने,शीट बेल्ट नसणे आदीं बाबतीत केस दाखल करून दंड वसूल केला आहे.
लॉकडाऊनमध्ये महामार्ग पोलिसांना बॉर्डर चेक पोस्टवर तैनात केले होते. कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी महामार्ग पोलीस दलाचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला आहे. सोलापूर पुणे, सोलापूर-उस्मानाबाद, सोलापूर-विजापूर या महामार्गावर या पोलिसांची टीम तैनात असते. 2 शिफ्टमध्ये या टीम मार्फत कामकाज केले जाते. एकूण 2 अधिकारी व 36 पोलीस कर्मचारी ड्युटी बजावत आहेत.
महामार्गावर जनजागृती करत व अपघात रोखण्यासाठी सर्व उपाययोजना
सोलापूर जिल्ह्याला लागून दोन राज्यांची सीमा जोडलेली आहे. तसेच दक्षिण भारतात जाताना सोलापूरहुन जावे लागते. औरंगाबाद, लातूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, या शहराला देखील सोलापुरातील रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे वाहनांची मोठी गर्दी महामार्गावर पाहावयास मिळते. यामुळे हायवे पोलीसंवर मोठा ताण निर्माण झालेला असतो. यासाठी दंड ठोठावणे व किंवा जनजागृती करणे हे उपाय हायवे ट्रॅफिक पोलीस करत आहेत. तसेच अपघात रोखण्यासाठी देखील विशेष उपाययोजना करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.