सोलापूर - येथे रविवारी सकाळच्या सुमारास कोंबड्या घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा सोलापूर पुणे महामार्गावर अपघात झाला. बाळे पुलाजवळील नेक्सा शोरुमसमोर सकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातातील व्यक्तीला मदत न करता सोलापुरातील काही नागरिकांनी त्या गाडीतील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी एकच गर्दी केली. अक्षरश: एकमेकांना ढकलत दहा-दहा पंधरा-पधरा कोंबड्या एका-एका व्यक्तीने पळवल्याचे व्हिडिओत पाहावयास मिळत आहे.
माश्यांची देखील लूट केली होती-
काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे कर्नाटकातील एक मांगुर माशाने भरलेला ट्रक सोलापूर-विजापूर रोडवरील संभाजी तलावानजीक पलटी झाला होता. त्यावेळी त्यातील हजारो मांगुर मासे गटारीच्या पाण्यात पडले होते. त्यावेळीही परिसरातील नागरिकांनी अक्षरशः गटारीत हात घालून मासे लुटले होते. त्यामुळे नेहमी अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाणारे काही सोलापूरकर मात्र आता लुटारूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
पुण्याहुन मराठवाड्याकडे कोंबड्या घेऊन जात असताना टेम्पोचा अपघात-
पुण्याहून मराठवाड्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पोचा रविवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला होता. मात्र, अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून कोंबड्यांची पळवापळवी केल्याचे निदर्शनास आले. काही जण छोटा टेम्पो घेऊन आले तर काहीजणांनी रिक्षात बसेल तितक्या कोंबड्या भरून घेऊन गेल्या. तर अनेकांनी दुचाकीवर भरभरून कोंबड्या पोबारा केला. किळसवाणी बाब म्हणजे अपघातात मेलेल्या कोंबड्यादेखील नागरिकांनी पळवून नेल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, अपघातस्थळी पोलीस वेळेत न पोहोचल्याने असे पाळवापळवीचे प्रकार निदर्शनास येत आहेत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारांना पोलीस प्रशासन कसा आळा घालते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - ग्रँड सेंटर मॉलबाहेर तरूणावर कोयत्याने हल्ला करणारांना अखेर अटक