सोलापूर - पुढील काळात देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पालकमंत्री दत्ता भरणे यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. सद्यस्थितीत सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांच्या पुढे गेली आहे. शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी आणि या महामारीपासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शुक्रवारी दिवसभर सोलापूर दौरा व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या हळूहळू कमी होत आहे. ही आनंदाची बाब आहे. पण गाफील न राहता सुरक्षा बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. काही दिवसांपूर्वी युरोपमध्ये अचानक कोरोना विषाणू महामारीची लाट आली. एका दिवसातून 50 हजार रुग्ण आढळ्याने त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर व आरोग्य व्यवस्थेवर भयानक दुष्परिणाम झाले.
तशी परिस्थिती भारतात किंवा सोलापुरात होऊ नये. कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा नको. अशा सक्त सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिल ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.दुधभाते आदी उपस्थित होते.