सोलापूर - दरवर्षी आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीचा असतो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या ( Sri Vitthal-Rukmini Temple ) गाभाऱ्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. पहाटे ३ वाजून १० मिनिटाच्या सुमारास विठ्ठल- रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला.
आचार संहिंतेचे पालन करत महापूजा - पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवर पूजेची परवानगी देण्यात आली होती. विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते.
वारकरी दाम्पत्याचा सन्मान - मुख्यमंत्र्यांसोबतच दर्शन रांगेतील पहिल्या वारकऱ्यासही विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळत असतो. यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसोबत केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. शिवाय मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी याच्यासह अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनासह सर्व अडचणी दूर कर - आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर, असे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले. मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेच्या वेळी वारकरी रांगेतील वारकरी बीडचे नवले दाम्पत्य होते. विठ्ठल पूजेचा मान मिळालेल्या मुरली भगवान नवले व जिजाबाई मुरली नवले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवलेंची वारीची परंपरा - शासकीय पूजेचा मान मिळालेले नवले दाम्पत्य हे अनेक वर्षांपासून पायी वारी करीत आहेत. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरू आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत. आज त्यांच्या भाग्यात विठ्ठलाच्या पूजेचा मान होता. भगवान नवले आमि जिजाबाई नवले यांनीही अत्यंत मनोभावे विठ्ठलाची पूजा केली.
निर्बंधमुक्त आषाढी वारी - कोरोनामुळे मागील दोन वर्ष आषाढी वारी झाली नव्हती.अनेक निर्बंधात पंढरपुरातील आषाढी वारी पार पडली होती. मात्र यंदा आषाढी वारी निर्बंधमुक्त पार पडत आहे. वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून जवळपास 15 लाखांचा भाविकांचा महासागर लोटला आहे.विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरासोबतच चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी लाखो वारकर्यांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी ८ तासांहून अधिक वेळ लागत आहे तर पदस्पर्श दर्शनासाठी १४ तासाहून अधिक वेळ लागत असल्याचे मंदिर समितीच्यावतीने माहिती देण्यात आली.
टाळमृदुंगाच्या गजरात आषाढी वारीचा सोहळा - आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास सर्वच मानाच्या संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या तर मुख्यमंत्रीही रात्री उशिराने पंढरीत दाखल झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात रविवारी 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे.
वारकऱ्यांची पंढरीत लगबग - आळंदी आणि देहू वरून निघालेले लाखो वारकरी आता पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. वारकरी आता चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूर पर्यंत पोहोचले आहेत. शेकडो किलोमीटर पाय चालत विठूरायाचे नामस्मरण करीत लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरीमध्ये आज सुमारे 15 लाख भाविक विठ्ठलाच्या ओढीने आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा - आषाढी वारीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकरी व विठ्ठल भक्तांना शुभेच्छा पंतप्रधानांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पायी चालत पंढरपूर या संत नगरीमध्ये आले. आषाढी एकादशीला आलेल्या सर्वांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.