सोलापूर - कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाने नवी शक्कल लढवत मिळकत दारांच्या घरासमोर ढोल ताशा वाजवून वसुली सुरू केली आहे. सोलापुरातील हजारो मालमत्ता थकबाकीदारांकडून कोट्यावधी रुपयांचे कर थकीत आहे. अशा थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन ढोल ताशा वाजवून कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला जे मिळकतदार प्रतिसाद देत नाहीत. अशा घरांचे पिण्याचे पाण्याचं नळ कनेक्शन तोडले जात आहे. तसेच मालमत्ता सील केली जात आहे. पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन अधिकारी विशेष मोहीम घेत आहेत.
सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने मिळकत दारांच्या घरासमोर हलगी आणि ढोल ताशा वाजवून कर संकलन करण्यासाठी महाशिवरात्रीचा मुहुर्त निवडला आहे. याला देखील प्रतिसाद न देणाऱ्या मिळकत दारांचे नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता जप्त करणे, अशी कारवाई केली जात आहे. यासाठी 1 लाख ते 3 लाख आणि 3 लाख ते 5 लाखापर्यंतच्या मिळकत दारांची यादी तयार केली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कर संकलन अधिकारी मिळकत दारांच्या घरासमोर ढोल ताशा वाजवून कर वसुली करत आहेत.
शहरातील कर थकबाकीदार-
शहरात 10 लाख कर थकवलेले 53 थकबाकीदार आहेत. 3 ते 5 लाख रुपयांची कर थकवलेले 267 मिळकत दार आहेत. 1 ते 3 लाख कर थकवलेले 2 हजार मिळकत दार आहेत. सोलापूर महानगरपालिकेला कर संकलन हे मोठे उत्पन्न आहे. त्यामुळे कर संकलनाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. कर संकलनासाठी सोलापूर महानगरपालिकेने शहर आणि हद्दवाढ, असे दोन पथक तयार केले आहेत. जे कर वसुलीसाठी धडक मोहीम राबवत आहेत. गुरुवारी हद्दवाढ भागात या पथकाने लाखो रुपयांचे रोकड आणि चेक स्वरूपात कर संकलन केले. यावेळी कर्मचारी व अधिकारी ढोल ताशासह कर वसुली करत होते.
हेही वाचा- रात्रीपासून जनता कर्फ्यू लागणार असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी