सोलापूर - कोरोनाची लस आली असून लवकरच जिल्हा व शहर कोरोनामुक्त करू, असा विश्वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ते पोलीस मुख्यालय मैदानावर बोलत होते.
कोविड योद्धयांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा व शहरातील कोविड योद्धा रात्रंदिवस झटत आहेत. कोविडनंतर पहिलाच राष्ट्रीय सोहळा 72 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. यावेळी सोलापूर आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व पोलिसांचा मानचिन्ह देत पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाविकास आघाडीला नुकताच एक वर्ष पूर्ण
राज्यात महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने राज्याच्या विकासासाठी, उद्योगाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना आणल्या आहेत. आपला सोलापूर जिल्हा हा शेती व शेती पूरक उद्योगावर आधारित जिल्हा आहे. यासाठी जिल्ह्यातील शेयकऱ्यांना व शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार त्यांसोबत आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध
महापूर किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आजतागायत 250 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप केली आहे. आणखीन 250 कोटी मिळाले आहे. लवकरच त्याचे देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे. महावितरणचे कामकाज पारदर्शक होण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे.अखंडितपणे वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - अक्कलकोट संस्थानने विलीनीकरणावेळी पाच लाख 'सोन्याचे होन' देऊन लोकशाहीला दिले बळ