सोलापूर- दिवेघाटात दिंडीत जेसीबी घुसवलेल्या चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी संघटनेने केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची मागणी करणारे निवेदन सोलापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
हेही वाचा - सोपान महाराजांवर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत इंद्रायणी घाटावर अंत्यसंस्कार
पंढरपूर ते आळंदी कार्तिकी वारी पायी पालखी सोहळ्यामध्ये दिवेघाटातील दिंडीत जेसीबी शिरल्याने झालेल्या अपघातात श्री संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास व अतुल महाराज आळशी यांचे निधन झाले. या अपघातामधील मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना ५ लाख रुपयांची मदत त्वरित द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.
मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना देण्यात आले. संबंधित ड्रायव्हर व जेसीबी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांनी दिला आहे. यावेळी सचिव बळीराम जांभळे, शहराध्यक्ष ज्योतीराम चांगभले, संजय पवार, शिवाजी महाराज शिंदे, सुरेश पोखरकर, बालाजी कोटा, निवृत्ती मोरे, भाऊसाहेब बेलेराव,आदर्श इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.