सोलापूर - 'शहरात कोरोना महामारीने कहर केला आहे. दररोज पाच ते सहा जणांचे मृतदेह दफन किंवा विद्युत दाहिनीमध्ये दहन करावे लागत आहेत. ही वाईट वेळ आमच्यावर आली आहे. देवाकडे ही एकच प्रार्थना आहे, की ही महामारी लवकर जाऊ दे,' अशी प्रतिक्रिया अंत्यसंस्कार करणारे महानगरपालिकेचे कर्मचारी व इतर समाजसेवकांनी दिली आहे. ईटीव्ही भारत (मराठी)चे प्रतिनिधी इरफान शेख यांनी सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आलिशा काळे, भीमरत्न माने व बाबा मिस्त्री यांच्यासोबत केलेली ही खास बातचीत...
आजपर्यंत 100पेक्षा जास्त कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार केले आहेत. सुरुवातीला भीती वाटली, मात्र, आता भीती गेली असल्याची माहिती जडेसाब मुस्लीम कब्रस्तान येथे दफनविधी करणाऱ्या आलिशा काळे यांनी दिली. भीमरत्न माने हे देखील त्याच कामात व्यस्त असतात. जेसीबीच्या साहाय्याने 10 फूट खड्डा खोदणे, त्यानंतर ब्लिचिंग पावडरने पूर्ण कबरवर फवारणी करण्याचे काम माने करतात. पीपीई किटचा वापर करूनच ते ही सर्व कामे करतात. पूर्ण धार्मिक रिती-रिवाजाने एका मुस्लीम मौलवीच्या मार्गदर्शनाने दफन विधी केला जातो.
मे महिन्यात सुरुवातीला प्रथमच हे काम हाती सोपवले गेले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास पहिल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी फोन केला होता. सुरुवातीला भीती वाटली मात्र, धाडस करत मुस्लीम कब्रस्तान गाठले. जेसीबीच्या सहाय्याने 10 फूट खोल खड्डा खोदला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कब्रस्तानात येऊन मार्गदर्शन केले. पीपीई किट परिधान करण्यास शिकवले. त्यांसोबत काही मौलवीदेखील उपस्थित होते. कबरीमध्ये बॅटरीच्या उजेडात ब्लिचिंग पावडर मारली. पांढरा धुराळा उडताना मनात भयानक, अशी भीती निर्माण झाली होती, अशी प्रतिक्रिया काळे यांनी दिली.
ज्या ठिकाणी राहतो तेथील नागरिकांना व शेजाऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. ज्यावेळी त्यांना आमच्या कामाबद्दल माहिती झाली. त्यावेळी त्यांनी संशयाच्या नजरेने पाहिले. मात्र, प्रशासन दर आठवड्यात आमची तपासणी करत आहे, जेणे करून आम्हाला कोरोनाची लागण झाली की नाही याची माहिती मिळेल. प्रशासन आमची काळजी घेत असल्याचेही काळे यांनी सांगितले.
सोलापूरमधील कोरोनाचा पहिला मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी आम्ही केला. रात्री 2 वाजता विधी करून घरी गेलो, तर घरच्यांनी मला घराबाहेर थांबण्यास सांगितले. मी बाहेरच गरम पाण्याने अंघोळ केली. त्या रात्री मला झोप लागली नाही. आता मात्र, सवयीचे झाले आहे, असे बाबा मिस्त्री यांनी सांगितले.
भेदभाव करू नका -
ज्या ठिकाणी कोरोना विषाणूने व्यक्ती मृत होतो, तेथील परिसर सील केला जातो. मात्र, आजूबाजूचे नागरिक त्या कुटुंबासोबत भेदभाव करतात. माझ्यासोबत देखील भेदभाव झाला आहे. वाईट नजरेने बघितले गेले आहे, असे बाबा मिस्त्री यांनी सांगितले.