सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ( Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University ) परीक्षा ( Exam Fever 2022 ) यंदाच्या वर्षी ऑनलाइन ( Online Exam ) व ऑफलाइन ( Offline Exam ) होणार आहेत. यासाठी सोलापूर विद्यापीठ जय्यत तयारी करत आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना विविध सूचना देण्यात आल्याची माहिती परीक्षा प्रमुख डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. दोन वर्षानंतर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा या ऑफलाइन होणार आहेत. 25 मे, 2022 पासून याची सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांमध्येही ऑफलाइन परिक्षेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
...अन्यथा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई - महाविद्यालयांनी आपापल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी योग्य ती बैठक व्यवस्था करावी, याबाबत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना नोटीस आणि सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासंबंधी विद्यापीठ प्रशासन वेगवेगळ्या महाविद्यालयांची अचानकपणे तपासणी करणार आहे. विद्यार्थी परीक्षा देताना त्यांची काही गैरसोय होत असेल तर संबंधित महाविद्यालयावर कारवाई करणार असल्याची माहिती डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.
ऑफलाइन परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा सराव घेणे आवश्यक - कोरोनामुळे सोलापूर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा या गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन झाल्या. मात्र, यंदा कोरोना महामारीचा संसर्ग किंवा त्याची तीव्रता कमी झाल्याने सोलापूरसह राज्यातील निर्बंधात शिथिलता आली आहे. त्यानुसार सोलापूर विद्यापीठ ( Solapur University ) प्रशासनाने शासनासोबत चर्चा करुन यंदाच्या परीक्षा या ब्लेंडेड म्हणजेच ऑफलाइन आणि ऑनलाइन होणार आहेत. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात परिक्षेपूर्वी त्यांच्या विविध प्रकारच्या सराव परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मासिक सराव परीक्षा किंवा आठवड्यातून सराव परीक्षा घेणे आवश्यक आहे.
परीक्षेअगोदर विद्यार्थ्यांसाठी 'अशी' व्यवस्था करावी - सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची नियोजनबद्ध व्यवस्था करावी, अशा सूचना सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत. त्यांना योग्य ते पुस्तके उपलब्ध करून द्यावी. तसेच ऑफलाइन क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी मार्गदर्शन करावे आणि परिक्षेबाबत सर्व अडचणी सोडवाव्यात. ब्लेंडेड परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती द्यावी, अशा सूचना महाविद्यालय प्रशासनाला दिल्या आहेत.
हेही वाचा - Exam Fever 2022 : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांबाबत मोठी बातमी; जाणून घ्या कशी होणार परीक्षा