सोलापूर - साडेएकवीस लाख कोटीचे पॅकेज सरकारने जाहीर केले. त्यात उद्योजकांच्या कर्जासाठी साडेअकरा लाख कोटी राखून ठेवले, भांडवलदारांचे साडेसात लाख कोटी कर्जमाफी केली तर कामगारांसाठी साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली. जनधनच्या नावाने फक्त 500 रुपयांची मदत दिली. ही विसंगती आम्हाला मान्य नाही. केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीकडून 3 जुलै हा दिवस मागणी दिन पाळण्याची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सोलापूरात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सकडून शुक्रवार 3 जुलैला ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
ऑगस्टच्या आत याचा निर्णय नाही झाल्यास एक लाख कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी यावेळी दिला. सिटूचे राज्य महासचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विडी, यंत्रमाग, घरेलू, रेडिमेड व शिलाई, ऑटोरिक्षा चालक तसेच 122 उद्योग धंद्यातील असंघटीत कामागरांचे टाळेबंदीच्या कालावधीतील उदरनिर्वाहासाठी राज्य सरकार 10 हजार रुपये रोख अनुदान देण्यात यावे. या मागणीकरता प्रत्येकांचे वैयक्तीक अर्ज भरून सिटूकडे जमा केलेले आहे. यासाठी 25 मे पासून ते 30 जून पर्यंत अर्ज भरण्याची मोहिम राबविण्यात आली.
अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक कामगाराला 10 हजार रोख अनुदान मिळावे याकरता त्यांचे वैयक्तीक अर्ज हमाल गाडीतून जिल्हा परिषद पूनम गेट ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत ओढत आणले. आंदोलनावेळी सिटू चे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटपट झाली. सदर बझार पोलीस ठाणे प्रशासनाकडून माजी आमदार आडम मास्तर यांच्यासह 16 कार्यकर्त्यांना अटक केले.
या आंदोलनात कुरमय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, अनिल वासम दाऊद शेख,नरेश दुगाणे,अशोक बल्ला,शंकर म्हेत्रे, दीपक निकंबे, माशप्पा विटे, लिंगव्वा सोलापूरे, बापू साबळे,विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, बाबू कोकणे, किशोर मेहता, शकुंतला पानिभाते, अकील शेख, आसिफ पठाण,इलियास सिद्दीकी, जावेद सगरी,श्रीनिवास गड्डम, आप्पाशा चांगले, राजेंद्रप्रसाद गेंट्याल, रवी गेंट्याल, बाळासाहेब मल्ल्याळ,सनी शेट्टी,विजय हरसुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.