सोलापूर - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी सुधारणा योजनेतील निधी मिळावा या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेविका श्रीदेवी फुलारे व आनंद चंदनशिवे यांनी गांधीगिरी पद्धतीने महापालिका प्रशासकीय इमारतीचा प्रवेशद्वारात बूट पॉलिश आंदोलन केले. या आंदोलनामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. नगरसेवक श्रीदेवी फुलारे आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या बूट पॉलिश आंदोलनावेळी बघ्यांची गर्दी मोठी झाली होती.
'महापौरांचेदेखील बूट पॉलिश करणार'
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी सुधारणा योजनेतील निधी मिळवण्यासाठी महापौरांना जात दाखवावी लागत असेल तर मी सुद्धा जात दाखवायला तयार आहे, असे म्हणत महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच काँग्रेस नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी गांधीगिरी पद्धतीने बूट पॉलिश करत आंदोलन करत निधीची मागणी केली. निधीसाठी वेळप्रसंगी आपण महापौर श्रीकांचना यन्नम यांचे बूट पॉलिश करू, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दलित वस्ती सुधारणेसाठी सभागृहात गोंधळ
दलित वस्ती सुधारणा निधीसाठी सर्वांना समान निधी द्यावा, अशी मागणी करत 20 जानेवारी रोजी झालेल्या सभेत नगरसेवकांनी एकच गोंधळ केला होता. 20 जानेवारी रोजी सभागृहात नगरसेवक श्रीदेवी फुलारे व इतर नगरसेवकांनी महापौर दालनासमोर ठिय्या आंदोलन केले होते. आज गुरुवारी अर्थसंकल्प मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती, परंतु अनेक नगरसेवकांचे मागील प्रश्नदेखील सुटले नाहीत. त्या प्रश्नांचा निपटारा करा, अशी मागणी करत बूट पॉलिश आंदोलन केले.
मोठा पोलीस बंदोबस्त
आज गुरुवारी सोलापूर महापालिकेचा 2020-2021चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 20 जानेवारी 2021रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला होता. आजदेखील मोठा गोंधळ होईल, या अनुषंगाने पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा पालिकेत तैनात करण्यात आला होता. बूट पॉलिश आंदोलनावेळी पोलिसांनी घेराबंदी केली होती.