सोलापूर - मी लहानपणापासून ऐकत आहे, शरद पवार पंतप्रधान होणार आहेत. मात्र गेल्या तीस वर्षांपासून शरद पवार देशाचे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. शरद पवार यांच्या पार्टीचे तीन-चार खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. तसेच दिल्ली येथे राष्ट्र मंचच्या बैठकीबाबत बोलताना पडळकर यांनी बैठकीतील सर्व नेत्यांना कोंबडा अशी उपमा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी सोलापूर दौरा आयोजित केला होता. दौरा सुरू करण्यापूर्वी पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली.
ओबीसी आरक्षणा विरोधात काँग्रेस नेत्याच्या मुलाची याचिका-
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारकडे अहवाल मागितला होता. मात्र राज्य सरकारने 15 महिन्यात अहवाल सादर केला नाही. राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे डीएनए बहुजन विरोधी आहेत. काँग्रेसच्या नेत्याच्या मुलानेच याचिका दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसींना देण्यात आलेल्या राजकिय आरक्षणाविरोधात आवाहन दिले होते. मुठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका केली.
शरद पवारांच्या दिल्ली बैठकीवर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल-
रात्र गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात! त्यामुळे पुढे कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा करत दिल्ली येथे तिसऱ्या आघाडी बाबत बैठक झाली असल्याची टीका पडळकर यांनी केली आहे. तसेच कोंबड्याला वाटते मी उठल्याशिवाय दिवस उजाडत नाही, असे अनेक कोंबडे एकत्र येत दिल्लीत बैठक पार पडली असल्याची बोचरी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि दिल्ली येथे झालेल्या बैठकीवर केली आहे.
ओबीसी आमदारांची संख्या भाजपा मध्ये अधिक-
ओबीसी आमदारांची संख्या भारतीय जनता पार्टी मध्ये अधिक आहे. या सरकारमध्ये ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री का झाला नाही? धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष का झाले नाहीत? सरकार नसताना धनंजय मुंडे रस्त्यावर आले, मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार पुढे आले, अशी टीका अजित पावर यांवर पडळकर यांनी केली.