सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाच्या शिवारात बांधकाम सुरू असताना सरड्याची अंडी आढळली होती. पाच अंडी सुखरूप जतन करून सोलापुरातील नेचर कंझर्वेशनच्या सदस्यांनी कृत्रीमरित्या या पाच अंड्यातून सरड्यांच्या पिल्लांना जन्म दिला. या पाचही सरड्याच्या पिल्लांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.
कुंभारी गावामधील मल्लिनाथ बिराजदार यांच्या घराचे बांधकाम चालू होते. बांधकामासाठी खड्डा खोदत असताना तिथल्या बांधकाम कामगारांना जमिनीत काही अंडी दिसली. खड्डा खोदत असल्याने काही अंडी दबून गेली तर काही अंडी राहिली होती. ही अंडी सापाचे असतील या भीतीने कामगारांनी काढून फेकून देण्याचे ठरविले होते. काही अंडी त्या कामगारांनी फेकून ही दिली. पाच अंडी उरली असताना मल्लिनाथ बिराजदार हे तेथे पोहचले. कामगारांनी त्यांना सर्व माहिती दिली. लगेचच मल्लिनाथ यांनी राहिलेले पाच अंडी बाजूला काढून ठेवली. मल्लिनाथ यानी ही माहिती विनय गोटे यांना दिली व त्याचे काही फोटो पाठवले. विनय यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अंडी सरड्याची आहेत हे ठामपणे सांगितले. मल्लिनाथ यांच्या येथे बांधकाम चालू असल्यामुळे त्यांनी सुरक्षितता म्हणून ती अंडी विनय गोटे व अजित चौहान यांच्याकडे सुपूर्द केली. विनय गोटे यांनी संतोष धाकपाडे यांच्याकडे ती अंडी कृत्रिमरीत्या उबवण्यासाठी दिली.
मल्लिनाथ यांनी राहिलेली अंडी इतरत्र न टाकून दिल्यामुळे त्या पाच अंड्यातून दोन पिल्ले ०७ ऑगस्टला दुपारी १२:४५ च्या दरम्यान बाहेर आली. राहिलेल्या तीन अंड्यातून ३१ ऑगस्टला एक पिल्लू बाहेर आले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ सप्टेंबरला दोन अंड्यातून दोन पिल्लं बाहेर पडली.
२३ जुलै दरम्यान मिळालेल्या अंड्यातून पहिले दोन पिल्लं १५ दिवसात बाहेर पडली. तर राहिलेल्या तीन अंड्यातून ४० आणि ४१ दिवसाचा कालावधी लागला. ही सर्व पिल्लं परत निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आली. डॉ. प्रतीक तलवाड, डॉ. वरद गिरी आणि शिवानंद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यु ट्यूबच्या माध्यमातून ही सरड्याची अंडी कृत्रिमरित्या उबविण्यात आली आहे.