सोलापूर - महानगरपालिकेच्या वतीने परिवर्तन सोलापूर अॅप तयार करण्यात आले असून त्याची सुरुवात आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली आहे. सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना आपल्या हद्दीतील व सोलापूर शहरातील विविध तक्रारी 'परिवर्तन सोलापूर अॅप'च्या मध्यमातून टाकता येईल.
या विभागा विरोधात तक्रारी करता येणार
सोलापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा, नगर अभियंता, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग, कर संकलन विभाग, उद्यान विभाग, विद्युत विभाग इत्यादी विभागाच्या तक्रारी देण्यासाठी या मोबाईल अॅपद्वारे तक्रार करता येणार आहे.
नागरिकांचे हेलपाटे होणार कमी
महानगरपालिका किंवा विभागीय कार्यालय येथे नागरिकांना जावे लागत होते. तसेच नागरिकांना दिलेल्या तक्रारीची स्तिथी जाणून घेण्यासाठी वारंवार त्या कार्यालयात जावे लागत होते. सोलापूर महापालिकेचे हेलपाटे मारून नागरिकांचा जीव मेटाकुटीला येत होता. यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी 'परिवर्तन सोलापूर अॅप' हे मोबाईल अॅप सोलापूर शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे.
'असे' करा डाउनलोड
मोबाईल अॅप अॅण्ड्रॉइडच्या 'प्ले स्टोअर' व अॅपलच्या 'अॅप स्टोअर'मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अॅप इंटरनेटच्या साहायाने डाउनलोड करता येणार आहे.
तक्रारींचा निवाडा होणार असे
तक्रार टाकल्यानंतर तक्रारीच्या फोटो व अक्षांश व रेखांशसह तक्रार संबंधित विभागाच्या लेव्हल-1 अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे प्राप्त होते. संबंधित विभागाच्या लेव्हल-1 अधिकारी किंवा कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या वेळेमध्ये त्या तक्रारीचे निराकरण केले नाही तर ती तक्रार ही लेव्हल-2 अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे प्राप्त होईल. संबंधित विभागातील लेव्हल-2 अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या वेळेमध्ये सदर तक्रारीचे निराकरण केले नाही तर ती तक्रार ही लेव्हल-3 अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे प्राप्त होईल.ती तक्रार वेळेमध्ये निराकरण केले नाही तर ती तक्रार थेट महापालिका आयुक्तांंकडे प्राप्त होणार आहे. महापालिका आयुक्त या अॅप्लिकेशनबद्दल किंवा त्यामध्ये आलेल्या तक्रारीची वेळोवेळी आढावा बैठक घेणार आहेत. तरी सोलापूर शहरातील नागरिकांना महापालिकेच्या विविध विभागाशी निगडीत असलेल्या तक्रारी आपल्या मोबाईलच्या मध्यमातून टाकण्याची सोय करून देण्यात आली आहे. नागरिकांनी याचा भरपूर उपयोग करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
हेही वाचा - सोलापुरात शाळा सुरू; मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेम
हेही वाचा - भाजप सरकारच्या काळा सुशिक्षितांवर बेरोजगारीची कुऱ्हाड - जयंत पाटील