सोलापूर- जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2021-22 साठीच्या 349.87 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. जिल्ह्याच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेऊन वार्षिक योजनेसाठी 95 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितले.
जिल्हा नियोजन समितीने 349.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास दिली मंजुरी-
सन 2021-22 च्या आराखड्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी यंत्रणाकडून 802.53 कोटी रुपयांची मागणी आली होती. जिल्हा नियोजन समितीने 349.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 181.82 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र 151.67 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी 4.15 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील प्राधान्याच्या सर्वसाधारण योजनेसाठी 95 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाणार आहे. उपमुख्य मंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत ही अधिकची मागणी केली जाईल, असे भरणे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीला पूर्ण निधी मंजूर-
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधी वितरणासाठी काही निर्बंध घातले होते. मात्र आता 2021-22 साठीचा जिल्हा नियोजन समितीचा पूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. या निधीच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेवून काम करावे आणि विकासकामे वेळेत पुर्ण करावीत असे भरणे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समिती बैठकीतील विषय-
बैठकीत जिल्हा परिषदेच्या सोलापूर शहरातील शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण, पालखी मार्गावरील शाळांच्या पुनर्बांधणी, कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, राष्ट्रीयकृत बॅंकामार्फत कर्ज वितरण आदी मुद्यांवर चर्चा झाली. बैठकीस आमदार बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, शहाजीबापू पाटील, संजय शिंदे, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा- शेतकरी आंदोलनात शरद पवारही सहभागी होतील - जितेंद्र आव्हाड