सोलापूर - मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर सुरूच आहे. शनिवारी (काल) शहरात व ग्रामीण भागात 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1355 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 2036 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात दोन हजार रुग्ण कोरोनामुक्त
एकाच दिवशी ग्रामीण भागातील 9 हजार 748 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 हजार 393 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 1 हजार 355 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 2 हजार 36 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोलापूर शहरातही कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात 44 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात पंधरा हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात 29 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसाची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूर शहर वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एक जूनपर्यंत संचारबंदी असणार आहे. त्यातच आलेल्या अहवालानुसार 29 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर ग्रामीण भागांमध्ये 24 जणांचा तर शहरी भागात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.