सांगली - मागील लोकसभा निवडणुकीतच सांगलीमधील काँग्रेस संपली. आता यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्हही गायब झाले आहे, असा टोला भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी काँग्रेसला लगावला आहे. तर, एखादी ग्रामपंचायत निवडणूक न लढवणारे राहुल गांधी पंतप्रधानाची निवडणूक लढवत आहेत, अशी खोचक टीका भंडारी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
सांगलीमध्ये आयोजित लोकसभा निवडणुक कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना माधव भंडारी यांनी म्हणाले, राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी एखाद्यी ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणूक लढवली नाही. आणि आता ते पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहून लोकसभा निवडणुक लढवत आहेत, असा टोला भंडारी यांनी लगावला आहे. तसेच सांगली लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना सांगलीमध्ये काँग्रेसचे चिन्ह नाही, त्यामुळे प्रचाराची काय गरज आहे, असा प्रश्न पडला होता. कारण गेल्या निवडणूकीतच सांगलीमधील काँग्रेस संपली आहे. आणि आता या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्ह गयाब झाले आहे. त्यामुळे सांगली मध्ये भाजपाचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला.
सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.