पुणे - देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर खबरदारी घेणे गरजेचे असतानाच, समाजात समज-गैरसमज अधिक निर्माण झाले आहेत. कोरोना झाला म्हटलं की जवळची माणसंही दुरावतात. आपली म्हणणारी माणसं ही अनोळखी असल्यासारखे वागतात. परंतु, पुण्यात याउलट प्रत्यय आला. एका वयोवृद्ध आजीला अधिकचा ताप आला होता. तसेच ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाला समजली होती. परंतु, ती राहत असलेली जागा अतिशय चिंचोळी होती. त्या जागेतून स्ट्रेचर घेऊन जाणे - येणे शक्य नव्हते. अशा परिस्थिती याच भागातील निलेश पवार या तरुणाने पीपीई किट घातले आणि तिला खाली उचलून आणत रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा - पुण्याच्या रस्त्यावर अवतरला कोरोनारुपी यम, रेड्यावरून शहरात भ्रमंती
एरवी कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर त्याला आणण्यासाठी घरापर्यंत रुग्णवाहिका जाऊन रुग्णाला घेऊन येते. परंतु, या आजी जनता वसाहत येथील डोंगरावर राहत होत्या. त्या ठिकाणी जाण्यासाठी बारीक गल्लीतून स्ट्रेचर वर घेऊन जाणे आणि पुन्हा सुरक्षित घेऊन येणे हे अत्यंत जोखमीचे काम होते. हे काम कसे पूर्ण करायचे हा प्रश्न प्रशासनासमोर होता.
हेही वाचा - टाळेबंदीचे नियम झुगारून हॉटेल सुरू; पुणे पोलिसांकडून दोघे ताब्यात
कोरोनाचा रुग्ण म्हटल्यावर आजूबाजूचे कुणी मदत करायला तयार नव्हते. शिवाय या आजी वयोवृद्ध असल्यामुळे त्या चालू शकत नव्हत्या. अशावेळी या परिसरात राहणारा निलेश पवार हा तरुण पुढे आला. मागचा पुढचा विचार न करता त्याने पीपीई किट घातले आणि उंच डोंगरावर जाऊन त्या कोरोना पॉझिटिव्ह आज्जीला स्व:तच्या पाठीवर बसवून खाली घेऊन आला. ही आजी पॉझिटिव्ह आहे हे माहीत असताना तिच्यामुळे त्यालाही कोरोनाची बाधा होऊ शकली असती. पण याही परिस्थितीत त्याने हा धोका पत्करला आणि आज्जीला वेळेत रुग्णालयात दाखल केले.