पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये पबजी गेमचा आणखी एक बळी गेला आहे. पबजी गेम खेळत असताना 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हर्षल मेमाणे (वय-27) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेम खेळत असताना अचानक हर्षलला झटका आला आणि तो बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात राहणाऱ्या हर्षलचा पबजी गेम खेळत असताना तणावातून मृत्यू झाला, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी हर्षल हा नेहमी प्रमाणे घरात पबजी गेम खेळत होता. अचानक त्याला झटका आला आणि तो बेशुद्ध पडला. कुटुंबातील व्यक्तींनी तातडीने हर्षलला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
हर्षल गेल्या काही वर्षांपासून काहीच काम करत नव्हता. पूर्वी तो हाऊस किपिंगचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पबजी गेम जास्त खेळल्याने त्याच्यावर ताण येऊन त्याचा मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.