पुणे - सध्या कडाक्याचे ऊन पडले आहे. त्यामुळे लहान मुले, तरुण पोहण्यासाठी मोठ्या संख्येने जात आहेत. परंतु, खेड तालुक्यातील पोहायला गेलेला १७ वर्षीय तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. गौतम सुधीर निटूर असे मुलाचे नाव असून तो २४ तासापासून बेपत्ता आहे.
शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मोशी येथील स्पाईन सिटी येथे राहणारे ५ तरुण मुले पोहण्यासाठी मोई येथील दगड खाणीतील तलावांमध्ये गेली होती. गौतम आपल्या मित्रांसोबत पोहत असताना अचानक पाण्यामध्ये बुडाला. गौतमच्या मित्रांनी बचावासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली. मात्र, गौतमचा अद्याप शोध लागला नाही.
गौतमला शोधण्यासाठी सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दल, मोई ग्रामस्थ, खेड तहसीलदार अशी सर्व यंत्रणा शोधकार्य मोहीम राबवत आहे. परंतु, अद्याप गौतमचा पत्ता लागला नाही.