पुणे - पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी झालेल्या कराराची प्रत मिळावी, यासाठी उपोषण केले होते. पण, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीसंघटक, कुस्तीपटू यांच्या आग्रहास्तव आपले उपोषण सोडले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार व अनियमिततेबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या कुस्तीच्या हितासाठी वस्ताद, कुस्तीप्रेमी, कुस्ती संघटक आणि मल्ल रस्त्यावर आले होते. उपोषण सोडले असले तरीही आपला लढा सुरू राहणार असल्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला.
नेहरू स्टेडियम येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कार्यालयापासून स्वारगेट पोलीस ठाण्यापर्यंत पायी जात ही तक्रार देण्यात आली. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, हिंद केसरी योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी बाप्पुसाहेब लोखंडे, उपमहाराष्ट्र केसरी राजेश बारगुजे, यांसह शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्ल तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त मल्ल उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यात आली. तक्रारीची शहानिशा करून दोघांवर शासकीय अनुदानामध्ये भ्रष्टाचार केल्याबद्दल गुन्हा दाखल करून घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
काय आहेत आरोप - महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाबाबत सिटी कार्पोरेशन कंपनीचे मालक अनिरुद्ध देशपांडे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यामध्ये 2019 मध्ये करार करण्यात आला होता. या कराराप्रमाणे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे प्रायोजक म्हणून सिटी कार्पोरेशनने जबाबदारी घेतली होती. मात्र, या स्पर्धेचा खर्चाचा तपशील नीट मांडण्यात आला नसून, यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. स्पर्धेचा सर्व खर्च करणे, खेळाडूंना चांगली रोख रक्कमेची बक्षीस देणे आणि कुस्तीगीर परिषदेस प्रत्येक वर्षी 15 लाख रुपये राॅयल्टी देणे, असे मुद्दे समाविष्ट असल्याची तोंडी माहिती सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी कुस्तीगीर परिषदेच्या सभासदांना दिली होती. पण, कुस्तीगीर परिषदेच्या वार्षिक सभेमध्ये करानाम्यातील मुद्यांचे वाचन करण्यात आले नाही किंवा हरकतीवर चर्चा करण्यात आली नाही. एकप्रकारे सदर करारनामा वार्षिक सभेमध्ये मांडलाही नाही व त्यास वार्षिक सभेची मंजुरी ही घेतली नाही. कुस्तीगीर परिषदेतील सभासदांना अंधारात ठेऊन लांडगे यांनी सिटी कार्पोरेशन कंपनी मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्यासोबत करारनामा करुन महाराष्ट्र शासनाकडून 42 लाख 18 हजार रुपये लाटल्याचा आरोप भोंडवे यांनी केला.
3 जानेवारी, 2020 रोजी बालेवाडी येथे सिटी कार्पोरेशन कंपनीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले. पण, स्पर्धा संपल्यावर ठरल्याप्रमाणे विजेत्या कुस्तीगीरांना रोख स्वरुपात बक्षिस दिले नाही. 17 जानेवारी, 2020 रोजी सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांच्या स्वाक्षरीने महाराष्ट्र शासनास पत्र लिहून सदर स्पर्धेसाठी 2 कोटी 39 लाख 22 हजार 140 रुपये खर्च झाला असून, 70 लाख रुपये तूट येते आहे. तरी अनुदान म्हणून ती रक्कम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस मिळावे, असे कळविले. पत्रव्यवहार करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वार्षिक सभेची मंजुरी घेण्यात आली नव्हती अथवा सर्व सभासदांना याबाबत काहीच कळविण्यात आले नव्हते. 27 ऑक्टोबर, 2020 रोजी 42 लाख 18 हजार रुपये अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस देऊ केले. अनुदानाची रक्कम कुस्तीगीर परिषदेस मिळाल्यानंतर ही कुस्तीगीर परिषदेच्या सभासदांना याबाबत काहीच कळविण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा - Pune Traffic Police Action : पुणे वाहतूक पोलिसांनी सामनासह दुचाकी उचलली; व्हिडिओ होतोय व्हायरल