पुणे - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाबाबत होणारे प्रयत्न समोर येत असतात. पुण्यात देखील पर्यावरण प्रेमींनी राबवलेल्या देशी वनस्पती बीज संवर्धन कार्यक्रमाला चांगले यश येत आहे. अनोख्या पद्धतीने बीज संवर्धनासाठी प्रयत्न केले जात असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देशी बीज वाटप करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिना निमित्त या उपक्रमाचा घेतलेला हा आढावा.
बीज संवर्धनाचे प्रयत्न-
'वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे सांगत संतश्रेष्ठ तुकोबा रायांनी पर्यावरणाचे महत्व आपल्या अभंगातून अधोरेखित केले होते. या निकोप वृक्षवल्लीसाठी बीज ही निकोप हवे हे सांगण्यासाठी, 'शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी' असे संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात. आपल्या या वन राईचे संवर्धन करायचे असेल, चांगली देशी वनराई फूलवायची असेल तर त्यासाठी बीज संवर्धित केले पाहिजे, या उद्देशाने पर्यावरण प्रेमींनी नुकतेच बीज चित्र किंवा बीज रांगोळी या संकल्पनेवर आधारित स्थानिक देशी वृक्षांच्या - वेलींच्या बिया आणि फळे वापरून अनोखी कलाकृती साकार केली होती.
अनोखे बीज चित्र -
2 हजार स्क्वेअर फूट एवढ्या जागेवर हे बीज चित्र साकारण्यात आले होते. या बीज-चित्राच्या माध्यमातून जनमानसात बीज संस्कृती रुजावी, स्थानिक देशी वनस्पतींच्या बियांचे, परंपरागत धान्य, कडधान्य, औषधी, खाद्यपयोगी वनस्पती वाणाचे संवर्धन, जतन व्हावे या उद्देशाने या बीज - चित्राची निर्मिती करण्यात आली होती. बीज चित्रासाठी ४५ सपुष्प वनस्पतींच्या बिया आणि काही प्रमाणात फळे यांचा वापर करण्यात आला.
राज्यभरातून गोळा केले बीज -
हे बीज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषत: 12 मावळ, चंद्रपूर, सिल्लोड, भीमाशंकर, पुणे जिल्हा, लातुर, उस्मानाबाद, इतर ठिकाणाहून संकलित करण्यात आले होते. या बीज चित्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आद्य वृक्षसंवर्धक छत्रपती शिवाजी महाराज, प्राणवायूचा अखंड स्त्रोत असणाऱ्या वृक्षाची छबी, सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योगपती रतन टाटा या सर्वांचे एकात्मिक मिळून बीज चित्र साकारण्यात आले होते.
देशी बीजाचे वाटप -
त्यानंतर हे सर्व बीज ठिकठिकाणच्या पर्यावरण प्रेमींना वाटण्यात येते आहे, राज्यात तसेच कर्नाटक सारख्या इतर राज्यात ही हे बीज देण्यात आले आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बीज संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवला जात आहे.