पुणे - कोरोनामुळे जगाची समीकरणं बदलली आहेत. यानंतर सार्वजनिक संपर्क टाळण्यासाठी सर्वच स्तरांवर ऑनलाइन काम सुरू झाले. याच पार्श्वभूमीवर 'वर्क फ्रॉम होम'ची संकल्पना आणखी बळकट होऊ लागली. मात्र, या दरम्यान पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या मुलांच्या शाळादेखील ऑनलाइन सुरू झाल्या आहेत.
काही ठिकाणी पालकांचं वर्क फ्रॉम होम सुरू असताना मुलांचं ऑनलाइन शिक्षणही सुरू आहे. आता वर्क फ्रॉम होम करायचं की, मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाकडे लक्ष द्यायचं, असे अनेक प्रश्न पालकांसमोर उपस्थित झाले आहेत. काही घरात एकच संगणक आहे. काही ठिकाणी पुरेशी जागा नसल्याने आणखी अडचण वाढलीय. अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक चांगल्या मोबाइलची देखील कमतरता आहे. मोबाइलच्या स्क्रीनमुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास जाणवू लागला आहे. तासन् तास एकाच ठिकाणी बसल्याने अनेकांना पाठीचा आणि मानेचा त्रास होत आहे.
एकाच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण घेत असताना ऑनलाइन शिक्षणाबरोबर विद्यार्थी पुढचा वेळ दिलेल्या अभ्यासासाठी देत असताना शारीरिक हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे मुलांच्या स्वास्थाबद्दल पालक चिंताग्रस्त आहेत. काही ठिकाणी इंटरनेटच्या तांत्रिक कारणामुळे ही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभ्यास होत नाही. तसेच शिकवलेला अभ्यासक्रम मुलांना समजला की नाही, हे देखील कळत पालकांना समजत नाहीय.
काही घरांमध्ये एकाच वेळी दोन मुलं शिकत असतात, तर पालक देखील काम करत असतात. यावेळी आणखी अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीत बदल करण्याची मागणी पालक करत आहेत.