पुणे - दिवाळीतील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
पौराणिक कथा -
भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात. यामागे एक कथा प्रचलित आहे. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व मरण पावला त्या दिवशी यमी ने खूप अश्रू ढाळले. ती शांत व्हावी म्हणून इंद्राने रात्र तयार केली. त्याने सूर्य मावळतीला नेला त्याने यामीचे दुःख थोडे कमी झाले. परंतु तीने ब्रम्हाकडे साकडे घातले की मी जे औक्षण केले, त्याचे फळ मला द्यावे आणि त्या फळसवरुपत तिने यमाचे प्राण वाचवले म्हणून या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते.
हेही वाचा - Diwali Special - काय आहे नरक चतुर्दशीचे महत्व, पहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट