पुणे - आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा येत्या १ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. रात्री उशिरा १ वाजता राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार असून हरकती व सूचना, त्यावरील सुनावणी व अन्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ती 2 मार्च रोजी अंतिम केली जाणार आहे. यानंतर आरक्षण सोडत काढली जाणार असून त्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेमध्ये 58 प्रभाग -
दरम्यान पुणे महापालिकेमध्ये 58 प्रभाग असतील व प्रत्येक तीन सदस्यीय प्रभागाची सरासरी लोकसंख्या 61 हजार 669 च्या आसपास असेल. निवडणूक आयोगाने 2011 या वर्षाची जनगणना अर्थात 35 लाख 56 हजार 824 ही समोर ठेवून ही रचना केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात साधारण मतदार संख्या ही 56 हजारांच्या आसपास राहणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महापालिका १ फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर करेल. त्यानंतर त्यावर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत.
प्राप्त हरकती १६ फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. २६ फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी २ मार्च २०२२ रोजी निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.