पुणे - पुण्यातील येरवडा परिसरातील फुलेनगर व जयजवाननगरमध्ये सशस्त्र टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. यामध्ये दोन तरुण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्ववैमनस्यातून दहशत माजवण्याचा उद्देशाने हा प्रकार करण्यात आला असून, या टोळक्याने दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड केली.
7 ते 8 वाहनांची तोडफोड
टोळक्यांने धुडगुस घालत, 7 ते 8 वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली. तसेच दगडफेकीत दोन तरुण जखमी झाले आहेत. येरवडयातील फुलेनगरमधील महात्मा फुले उद्यानाजवळ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे फुलेनगर व परिसरात तणावपूर्ण शांतता होती.
दोन तरुण गंभीर जखमी
येरवड्यातील महात्मा फुले उद्यान तसेच आळंदी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची टोळक्याने लोखंडी रॉड आणि दगडाच्या साह्याने तोडफोड केली. या परिसरात दारू गांजा पिण्यासाठी बाहेरून मुले मोठ्या प्रमाणावर येतात. दोन दिवसांपूर्वी या परिसरात काही मुलांचा वाद झाला होता. त्यातूनच रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याचा अंदाज आहे. दरम्यान या घटनेमध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी येरवड्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.