पुणे - महामारीच्या काळात अनेक गुन्हेगारांना पॅरोलवर तुरुंगाबाहेर सोडण्यात आले आहे. मात्र, यापैकी काहींनी आणखी गुन्हे केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 2 ने मोटारी आणि दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 चारचाकी आणि 9 दुचाकी, अशी एकूण 14 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या वाहनांचा वापर दरोडा आणि चोऱ्या करण्यासाठी करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी सांगितले आहे. संबंधित कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन आणि पाचच्या पथकाने केली आहे.
आकाश उर्फ पप्या राजेंद्र सांडभोर (वय 25) सुजित उर्फ सुज्या भिवा गायकवाड (वय 27) ही आरोपींची नावे आहेत. हे सराईत चोरटे दुचाकीवरून निगडी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भक्ती शक्ती चौक परिसरात सापळा लावून त्यांना पकडण्यात आले.
चौकशीदरम्यान त्यांनी वाहनचोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपींकडून 5 चारचाकी व 2 दुचाकी वाहने जप्त करून एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत, तर गुन्हे शाखा 5 ने अल्पवयीन मुलांसह आरोपीकडून 7 दुचाक्या जप्त केल्या आहेत. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 5 कार आणि 9 दुचाकी, अशी एकूण 14 वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे वाहन चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्या पथकाने संबंधित कारवाई केली आहे.