पुणे - कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे पालक आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाव्यतिरिक्त कोणतेही कार्य होत नाहीय. त्यामुळे शाळांनी यंदा 50 टक्के शुल्क माफ करावे, अशी मागणी पुण्यातील विविध संघटनांनी करत महात्मा फुले मंडई येथे आंदोलन केल आहे.
आंदोलनात राजकीय पक्षांसह विविध संघटना सहभागी
ज्या महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मुलींनी शिकावे यासाठी बायकोचे मंगळसूत्र मोडले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतीराव फुले, आहिल्याबाई होळकर अशा महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन मुला-मुलींनी शिकावे म्हणून समाजासाठी वाहिले, अशा महाराष्ट्रात मध्यमवर्गीय गरीब जे जागतिक कोरोना महामारीमुळे आधीच त्रस्त आहेत, अशा पालकांना शाळा पूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावत आहे. शाळांमध्ये यावर्षीदेखील सांस्कृतिक उपक्रम, क्रीडाविषयक उपक्रम होत नाहीत तर त्याचे पैसे पालकांनी का द्यावे, म्हणून शाळांनी 50 टक्के शुल्क माफ करावे या मागणीसाठी शहरातील विविध संस्था, संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.
'फक्त ऑनलाइन शाळा सुरूच, मग संपूर्ण फी का?'
कोरोनामुळे शाळेत कोणतेही कार्यक्रम होत नाहीत. फक्त ऑनलाइन शाळाच सुरू आहे, असे असतानाही शाळेकडून संपूर्ण फी घेण्यात येत आहे. फी न भरल्यास विद्यार्थ्याला शिकवले जात नाही. हे चुकीचे असून शाळा प्रशासनाच्यावतीने 50 टक्के फी माफ करण्यात यावी आणि पालकांना जो त्रास दिला जात आहे, तो कमी करण्यात यावा, अशी मागणी यावेळी वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे यांनी केली.