पुणे - दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. शिक्षण घेताना मैत्री होते, मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. मुलगा हुशार व देखणा पण, जन्मतः अंध आणि मुलगी डोळस दोघांनीही ठरवले की पुढचे आयुष्य सोबतच रहायचे. पण, त्यांचे हे प्रेम यशस्वी होईल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. चित्रपटासाठी शोभावी अशी घटना प्रत्यक्षात पुण्यात घडली ( Valentine's Day Special ) आहे. देवता देशमुख ( Devta Deshmukh ) व राहुल देशमुख ( Rahul Deshmukh ), असे त्यांचे नाव आहे.
एक दिवस आधीच साजरा करायचे व्हॅलेंटाईन डे - पुण्याच्या एस.पी. महाविद्यालयात ( SP College Pune ) देवता व राहुल दोघेही शिक्षण घेत होते. शिक्षणासोबतच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. मित्र-मैत्रिणींची भेट महाविद्यालयात होतच होती. राहुल हे अंध होते. पण त्यांचे वागणे, विचार व आपल्याला ज्या अडचणी येत आहेत तशा अडचणी इतरांना येऊ नये यासाठी त्यांची चाललेली धडपड हे सर्व देवता यांना भावत होते. मित्र परिवारांच्या भेटी व्यतिरिक्त दोघांच्या एकांतातील भेटी वाटत गेल्या. दोघांमधील गप्पा वाढल्या, एकमेकांना समजू लागले, एकमेकांचे विचार पटू लागले. पण, आपल्या प्रेमाबद्दल मित्रमंडळी कळू न देण्याचे दोघांनीही ठरवले. त्यामुळे सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास ते भेटू लागले. एक दिवस आधीच व्हॅलेंटाईन्स डे साजरा करू लागले. देवता यांच्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे पहिल्या व्हॅलेंटाईन्स डेला राहुल यांनी देवता यांना स्वामी विवेकानंदांचे पुस्तक भेट दिले तर देवता यांनी राहुल यांना समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांची कॅसेट भेट दिली. दिवसेंदिवस एकमेकांचा सहवास आवडत असल्याने शेवटी त्यांनी आयुष्यभर सोबत राहण्याचा विचार केला.
समाजाने आपले निर्णय कोणावरही लादू नयेत - दरम्यान, राहुल यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकल चॅलेंजेस ( NAWPC ) ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून दोघेही अंध मुलांना सुशिक्षित बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. त्यांच्या या संस्थेची व संस्थेमार्फत होणाऱ्या कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली जाऊ लागली. एका अंध मुलाने अंध मुलीशीच विवाह करावा, असे समाजातील अनेकांचे म्हणणे आहे. पण, अंध व्यक्तीही सर्वाप्रमाणेच आहेत, त्यांना भावना असतात, त्यांच्याही आवडी निवडी असतात. त्यामुळे समाजाने कोणावरही आपले निर्णय लादू नये, असे राहुल देशमुख म्हणतात.
समाजातील मानसिकतेला दिला छेद - सर्व सुरळीत सुरू होते. देवता यांनी त्यांच्या आई-बाबांना राहुलबाबत सांगितले. देवता यांच्या घरुन सुरुवातीला विरोध झाला. पण, देवता यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर आई-बाबा तयार झाले. मात्र, भावांचा विरोध कायम होता. त्यांच्या संस्थेच्या कार्याबद्दल अनेज दिग्गजांसोबत त्यांच्या ओळखी होत्या. ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. लग्नावेळची सर्व जबाबदारी संस्थेतील स्वयंसेवकांनी स्वीकारली. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांसह राजकारणातील दिग्गज मंडळीही आशीर्वाद देण्यासाठी या लग्ना सोहळ्यात उपस्थित होती. अंध मुलाचा विवाह एखाद्या अंध मुलाशी व्हावा, अशा मानसिकतेला छेद देणारा हा विवाह सोहळा ठरला.
डोळस कामगिरी - देवता यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण करुन एका खासगी कंपनी नोकरी सुरू केली. राहुल हे देखील बँकेत नोकरी करु लागले. मात्र, संस्थेसाठी वेळ देऊ शकत नसल्याने राहुल हे चिंतित होते. पण, निस्वार्थ प्रेमच सर्व अडचणी समजू शकतो. यामुळे देवता या आपली नोकरी सोडून पूर्ण वेळ संस्थेचे काम करू लागल्या. आज ही संस्था अंथ मुलांसाठी डोळस कामगिरी करत आहे. देवता व राहुल यांनी प्रेमासाठी नको त्या वाट्याला जाणाऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.
संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी 'येथे क्लिक' करा
हेही वाचा - Valentine's Day : का साजरा केला जातो 'व्हॅलेंटाईन डे'?