पुणे - गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू ( Ukraine Russia War ) आहे. या युद्धाचे परिणाम सर्वत्र दिसू लागले आहे. रशिया हा जगातील मोठा गहू उत्पादक देश आहे. तर, युक्रेनचा गहू निर्यातीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. या दोन्ही देशांत युद्ध सुरु झाल्याने गव्हाची निर्यात थांबली आहे. त्यामुळे तब्बल 30 ते 40 टक्के भारताच्या गव्हाची निर्यात वाढली ( Increase demand Indian wheat ) आहे. गव्हाच्या किंमतीत देखील क्विंटलमागे 350 ते 400 रुपयांनी वाढ झाली आहे.
भारतात पिकणाऱ्या गव्हाची निर्यात बांग्लादेश, श्रीलंका, मलेशिया, चीन आणि पश्चिम आशियातील काही देशांत होते. तसेच, रशिया आणि युक्रेनमधील गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी असते. मात्र, तिथे युद्ध सुरु असल्याने निर्यात थांबली आहे. तर, मागणी वाढल्याने भारतीय गव्हाच्या निर्यातीत तब्बल 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी कैलास भुतडा यांनी दिली आहे.
सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा बाजारात नवे पीक येते तेव्हा भाव स्वस्त होतात. परंतु, मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. मागील वर्षी केंद्र सरकारने मिलबर गहू 2000 ते 2050 रुपये क्विंटलने खरेदी केला. अन्य देशातून मागणी असल्याने यंदा तोच गहू 2450 ते 2550 रुपयांनी खरेदी करण्यास सुरु केला आहे. ही खरेदी मोठ्या प्रमाणावर आहे. चांगल्या दर्जाच्या गव्हाच्या भावात यंदा तेजी राहण्याची शक्यता आहे, असेही भुतडा यांनी सांगितले.