पुणे - राज्यातील उष्णतेचा पारा अधिकच वाढताना दिसत आहे. मागील काही दिवस तापमानाचा पारा खाली घसरला होता खरा. त्यात आता पुन्हा वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या उष्णतेपेक्षा महाराष्ट्राला जास्त चिंता सतावते ती पाण्याची. पण, मागील 2 वर्षांपासून राज्यात पाऊस जास्त झाल्याने यंदा उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न सतावणार नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धारणांपैकी एक असलेल्या उजनी धरणात आजच्या परिस्थितीला 65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे 70 टीएमसी पाण्याची साठवणूक क्षमता असलेल्या उजनी धरणात आजच्या परिस्थितीत 35.19 टीएमसी पाणीसाठा शिल्लक ( Ujani Dam Water Storage ) आहे.
भीमा सिंचन प्रकल्पावर उजनी धरण बांधण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात असणारे हे धरण पाऊस नाही पडला तरी 100 टक्के भरते. कारण, पुणे जिल्ह्यातील मुळा आणि मुठा नदीतून येथे उजनी धरणात पाणी येते. धरणाची उंची साधारण 56.4 मीटर असून, लांबी 2534 मीटर आहे. या धरणात 70 टीएमसी म्हणजे 50850 दशलक्ष घनफुट इतके पाणी साठवणूक करता येते. सध्याच्या घडीला पुणे शहर परिसरात गेल्या 2 वर्षांहून अधिक काळापासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने उजनी धरण हे 100 टक्के भरते आहे. आजच्या दिवशी उजनी धरणात 65.68 टक्के म्हणजेच 35.19 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत उजनी धरणाचा पाणीसाठा शिल्लक राहणार असे, सांगितले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील धरणांची सध्याची स्थिती - पिंपळगाव जोगे धरणात 22.05 टक्के म्हणजेच 0.86 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकडोह धरणात 20.67 टक्के म्हणजेच 2.10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. येडगांव धरणात 93.59 टक्के म्हणजेच 1.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणात 51.68 टक्के म्हणजेच 0.60 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. डिंभे धरणात 38.56 टक्के म्हणजेच 4.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. घोड धरणात 50.02 टक्के म्हणजेच 2.44 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. विसापूर धरणात 33.31 टक्के म्हणजेच 0.30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. चिल्हेवाडी धरणात 60 टक्के म्हणजेच 0.49 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. चासकमान धरणात धरणात 50.89 टक्के म्हणजेच 3.85 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. भामा आसखेड धरणात 71.38 टक्के म्हणजेच 5.47 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पवना धरणात 46.91 टक्के म्हणजेच 3.99 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मुळशी धरणात 26.54 म्हणजेच 5.35 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
खडकवासला प्रकल्पात किती पाणीसाठा शिल्लक - खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणात 15.45 टक्के म्हणजेच 0.57 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. वरसगाव धरणात 54 टक्के म्हणजेच 6.96 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पानशेत धरणात 59.17 म्हणजेच 6.30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरणात 38.22 टक्के म्हणजेच 0.75 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पात 50.05 टक्के इतका पाणीसाठा म्हणजेच 14.59 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी 55.81 टक्के म्हणजेच 16.27 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.
गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, काही धरणांतील पाणीसाठा आजच्या तारखेला खूपच कमी झाला आहे. जिल्ह्यातील नाझरे धरणात आजच्या तारखेला 8.45 टक्के म्हणजेच 0.05 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.