पुणे - देशभरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आज (सोमवार) कर्नाटक आणि पंजाबनंतर आता महाराष्ट्रामध्येही कोरोना विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण दुबईहून परतले होते. या दोघांनाही पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जण निरीक्षणाखाली असून, २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ट्विट करत ही माहिती दिली होती. यामधील एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचीही माहिती मिळत आहे.
या दोन रुग्णांनंतर आता भारतातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. त्यांपैकी केरळमधील तीन रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जगभरातील १०० देशांमध्ये आतापर्यंत हा विषाणू पसरला असून, साधारणपणे १ लाख दहा हजार लोकांना याची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत एकूण ३,८०० लोकांचा बळी यामुळे गेला आहे.