पुणे - जिल्ह्यात ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना कोरोना होण्याची प्रमाण हे 0.19 टक्के आहे. तर ज्या नागरिकांचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा नागरिकांना कोरोना होण्याचे प्रमाण हे 0.25 टक्के आहे. याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दुसरा डोस घेतलेले नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नाहीत. तसेच ते नागरिक स्वतःची देखील काळजी घेत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः बरोबरच कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
हेही वाचा - 'बीएचआर'मधील गैरव्यवहार समोर आणल्यानेच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा; एकनाथ खडसे पुन्हा भाजपवर बरसले
- शाळांमधून कोविडं मार्गदर्शक सूचनांची माहिती द्यावी -
कोविडं संसर्गाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नसून, शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोविडं मार्गदर्शक सूचना आणि त्या अनुरूप वर्तणुकीची माहिती देण्यात यावी. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आणि खासगी शाळांना सूचना द्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांना कोरोना नियमांची सातत्याने माहिती देण्यात यावी. वर्गातील बैठक व्यवस्थेत शारीरिक अंतराचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. येत्या काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याची गरज आहे, असे अजित पवार म्हणाले.
- आजादी का अमृत महोत्सवानिमित्त लसीकरण मोहीम -
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून सलग 75 तास लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या कालावधीत सर्व लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. पुणे महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात देखील अशाच पद्धतीने 75 तासांची विशेष लसीकरण मोहीम घेण्यात यावी. जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी सहा तालुक्यात सुरुवातीला 75 तास आणि उर्वरित 7 तालुक्यात नंतर 75 तासात लसीकरण घेण्यात यावे. लोकप्रतिनिधींनी देखील लसीकरण मोहिमेत उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.
- सिरीजसाठी निधीची उपलब्धता -
सीएसआरच्या माध्यमातून मिळालेल्या लसींसाठी सिरींजची कमतरता भासत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1 लाख सिरींजची खरेदी केली. पुणे महापालिकेने देखील अशाच प्रकारे आवश्यकतेनुसार सिरींज उपलब्ध करून घ्यावे. ग्रामीण भागातील लसीकरणासाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. लसीकरणाचा वेग कायम राहील आणि पहिल्या लस प्रमाणे नागरिक दुसरी लस घेतील. यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे देखील यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
- नॉन कोविडं रुग्णांवर उपचाराची व्यवस्था -
जिल्ह्यात कमी होणारी कोविडबाधितांची संख्या लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात इतर आजारांच्या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करण्यासाठी सुविधा करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. ग्रामीण भागात एक रुग्णालय स्वतंत्र कोविडं उपचारासाठी आणि इतर रुग्णालय नॉन कोविडं रुग्णांसाठी असावेत. एकच रुग्णालय असलेल्या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. यासाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाचा समन्स; 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश