पुणे - नीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या आहेत. कृपया कुणाला दिसल्यास सांगावे, माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचे रोख बक्षीस देऊ, असे जाहीर करत भूमाता ब्रिगेडच्या नेत्या आणि महिलांच्या प्रश्नावर लढणाऱ्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे रेणू शर्मा प्रकरणात राज्यातल्या प्रमुख महिला नेत्या गप्प, का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
'आपला तो बाब्या...'
हाथरस प्रकरणात तिघीही खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळविण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. परंतु दुर्दैव असे आहे, की आपल्या राज्यात एखाद्या महिलेवर अत्याचार झाला आहे, असे जर ती सांगत आहे, पोलिसात तक्रार करीत आहे. पुरावे देत आहे, तरी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. तरी या तिघी महिला नेत्या गप्प का, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे. या महिला नेत्या ज्या पक्षाच्या आहेत, त्या पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारचे धनंजय मुंडे मंत्री आहेत, म्हणून "आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे, अशी भूमिका याबाबतीत या महिला नेत्या घेत आहेत, असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
'...सबलीकरण होणे अशक्य'
महिलांच्या सबलीकरणासाठी आवाज उठवत असताना आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाले, तर त्याविषयी बोलायचे नाही, अशी भूमिका जर महिला नेत्या घ्यायला लागल्या तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होणे अशक्य आहे. आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे, असे आवाहन देसाई यांनी या महिला नेत्यांना केले आहे.