पुणे - पुण्याच्या खडकी परिसरात साखरपुड्याच्या कार्यक्रमात जेवणावरून झालेल्या वादानंतर एका महिलेसह तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील दोघांना पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी गौरी सईद शेख (वय 22, रा. महात्मा गांधी वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहिदा शेख, शाहरुख नबु शेख, शौकत नबु शेख, मोहसीन निसार खान, निसार जंगु खान, यासीन खान, शबाना खान, अशिफ शेरू शेख आणि रुकसाना शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. यातील शौकत नबु शेख आणि निसार जंबू खान या दोघांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट मध्ये राहण्यास आहे. 20 फेब्रुवारी रोजी आरोपी रुकसाना शेख यांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. फिर्यादी कुटुंबातील सर्व सदस्य या कार्यक्रमाला गेले होते. साखरपुडा संपन्न झाल्यानंतर फिर्यादीचे पती जेवण करण्यासाठी गेले असता जेवण संपत आले होते. त्यावेळी आरोपी आसिफ शेरू शेख हा त्या ठिकाणी आला आणि "थाली तेरे लिये चाटणे को रखा है, तुझे खाणे को नही मिळता तू चाट" असे म्हणाला यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर वर नमूद केलेल्या आरोपींनी फिर्यादी सह तिघांना बेदम मारहाण केली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.