पुणे - पुण्याच्या येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेलेल्या दोन भावांच्या घरात दरोडा टाकत तब्बल शंभर तोळे सोने आणि रोख रक्कम असा सुमारे 53 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील संगमवाडी गावात माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे राहतात. या घटनेतील फिर्यादी हरिश्चंद्र मोझे यांच्या मुलाचा चार दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं सोने घरी आणले होते. वाढदिवस पार पडल्यानंतर ते महाबळेश्वर येथे संपूर्ण कुटुंबासह पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते रविवारी सायंकाळी घरी परत आले. यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आतील सामान विखुरलेले आढळले. तर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
हे ही वाचा - INS 'Hansa' Diamond Jubilee : गोव्याच्या मुक्तीसंग्रामात नौदलाचे विशेष योगदान, राष्ट्रपतींकडून गौरवोद्गार
दरम्यान चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर येरवडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराच्या परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तीन चोरटे त्यात आढळून आले. या चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत काही तासात घरातील मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा - ..तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचे आवाहन