पुणे - कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण आज देशभरात होते आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी जे कोरोना योद्धा म्हणून काम करत होते, त्यांना ही लस देण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना लस निर्माण करणार्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनीदेखील आज कोरोनाची लस टोचून घेतली.
अभिमानास्पद बाब
देशात सुरू झालेले सर्वात मोठे लसीकरण ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि यात कोव्हिशिल्ड लसीचा सहभाग आहे ही बाब आमच्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याचे पूनावाला यांनी ट्विट करून सांगितले आहे. तसेच या लसीची परिणामकारकता आणि सुरक्षा दर्शविण्यासाठी आपणदेखील आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत लस घेत आहोत, असे पुनावाला यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे.
लसीचे साईड-इफेक्ट्स नाहीत..
लसीसंदर्भात कायम अफवा येत असतात, मात्र आमची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या लसीचे त्या-त्या रुग्णानुसार काही छोटे साईड इफेक्ट्स दिसतील; मात्र त्यात काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे अदर म्हणाले. तसेच महिन्याला सहा ते सात कोटी डोस तयार करण्याची आपली क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.