पुणे - सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग केसमध्ये किरण गोसावी हा मुख्य साक्षीदार आहे. मात्र, गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याची बाब समोर आली आहे.
हेही वाचा - लोहगाव परिसरात मुसळधार पाऊस, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान विरुद्ध केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे, एनसीबी अधिकाऱ्यांच्या अडचणीत निश्चितच वाढ झाली आहे. आता या प्रकरणात ज्या किरण गोसावीला एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे तो गोसावी एक सराईत गुन्हेगार असल्याचा खुलासा झाला आहे.
पुण्यात फरार घोषित
आरोपी किरण प्रकाश गोसावी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल आहे. गोसावी याने मे 2018 मध्ये फेसबुकवरून मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती. याबाबत पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 29 मे 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु तो सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते.
पुणे पोलीस अटक करण्याच्या तयारीत
ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानंतर किरण गोसावी याचा आर्यन सोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता. यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत किरण गोसावी याच्यावर आरोप करत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. आता ज्या केसमध्ये किरण गोसावी फरार आहे, त्या केसमध्ये त्याला अटक करण्याची तयारी पुणे पोलीस करत आहे.
हेही वाचा - जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या - एकनाथ शिंदे