पुणे - दुचाकीवरुन जात असताना बीएमडब्ल्यू कार चालकाचा धक्का लागल्याने गाडी हळू चालवा असेच सांगणाऱ्या तरुणीला बीएमडब्ल्यू चालकाने लाकडी दांडक्याने भररस्त्यात मारहाण केली. ही तरुणी राज्य स्तरावरील कुस्तीपटू आहे. या मारहाणीत तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हात फ्रॅक्चर झाला आहे.
प्रकरणी गुन्हा दाखल
याप्रकरणी वैष्णवी गणेश ठुबे (वय 23) या तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीएमडब्ल्यू कारचा चालक सुमित टिळेकर आणि एक महिलेविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वैष्णवी खुबे ही तरुणी शुक्रवारी आपल्या वहिनीसोबत वानवडी परिसरातून जात होती. यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू गाडीचा धक्का तिच्या पाठीमागे बसलेल्या महिलेला लागला. यावर तिने बीएमडब्ल्यू गाडीच्या चालकाला गाडी हळू चालवा असे सांगितले. याचा राग आल्याने कार चालक असलेल्या सुमित टिळेकर यांनी या तरुणीला अश्लील शिवीगाळ करत गाडीतून लाकडी दांडके काढत बेदम मारहाण केली. यामध्ये वैष्णवी ठुबे हिच्या खांद्यावर आणि पाठीवर मारहाण झाल्याने तिच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - उपराजधानीत कोरोनानंतर डेंग्यूचे थैमान; पंधरा दिवसात १०६४ डेंग्यूचे रुग्ण