पुणे - पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि. 16) रात्री पुण्यात मोठी कारवाई करत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. नितीन चंद्रकांत ढगे (वय 40 वर्षे), असे लाचखोर उपआयुक्ताचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराजवळ सापळा रचून अटक करण्यात आली
नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपायुक्त आहेत. तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देखील आहेत. दरम्यान, यातील तक्रारदाराने पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी नितीन ढगे यांनी त्यांच्याकडे 8 लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. वानवडी येथील ढगे यांच्या घराजवळ सापळा रचून अटक करण्यात आली.
झडतीत मिळाली 2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता
नितीन ढगे यांना अटक केल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या राहत्या घराची रात्रभर झडती घेतली. या झडतीमध्ये रोख 1 कोटी 28 लाख 49 हजार रुपये, मालमत्तांची कगादपत्रे यासह एकूण 2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली आहे. कारवाई दरम्यान आढळून आलेल्या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती अवैध आहे याची तपासणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण; डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल