पुणे - दुष्काळी परिस्थितीमुळे मानवी वस्तीसह वन्यजीव प्राण्यांनाही दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांनाही या दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. अशात त्यांच्या चारापाण्याचा, संगोपणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, खेड तालुक्यातील खरपुडी येथील खंडोबा देवस्थानचे पुजारी या मोरांच्या संगोपणासाठी समोर आले आहेत.
खंडोबा देवस्थानच्या बाजूला असलेल्या वनविभागात मोठ्या संख्येने मोरांचे वास्तव्य आहे. मात्र, या मोरांना अन्नपाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खंडोबा देवस्थानचे पुजारी रविंद्र गाडे हेच या मोराचे पालक बनले आहेत. ते भल्या पहाटे मंदिराच्या बाजूला मोरांसाठी धान्य टाकतात. येथे पाण्याचीदेखील व्यवस्था केली गेली आहे.
उत्तर पुणे जिल्हा हा मोरांचे माहेरघर मानले जाते. अनेक गावांत मोर प्राचीन काळापासून आपलं वास्तव्य करतात. याच मोरांना पाहण्यासाठी जगभरातून नागरिक येत असतात. मात्र, आता या मोरांची भंटकंती सुरू झाली आहे. डोंगरदऱ्या आणि मोकळ्या माळरानांवर फिरत आपला चारा शोधत हे मोर दिवसभर भटकंती करत आहेत. त्यातच उन्हाचा वाढता तडाका त्यामुळे या मोरांचे जीवन धोक्यात आल्याचे गावकरी सांगतात.
अन्नपाण्याच्या शोधात हे मोर लोकवस्तीत येऊ लागले आहेत. वनविभागाच्या माळरानांवर पानवटे आणि चाऱ्याची व्यवस्था केली आहे. मात्र, हिरवेगार शिवार पाहून मोर लोकवस्तीत येऊ लागले आहेत. त्यामुळे लोकवस्तीत मोरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे खंडोबाच्या पुजाऱ्याने मोरांचे पालकत्व स्विकारले आहे, त्याचप्रकारे प्रत्येकाने जर मोरांच्या संगोपणासाठी हातभार लावला, तर त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवता येईल, हेच या निमित्ताने सांगता येईल.