पुणे - प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीचा ब्लेडने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. श्रीराम सुग्रीव गिरी असे संबंधित आरोपीचे नाव असून, सध्या तो फरार आहे.
हेही वाचा सिगारेटचे पैसे मागितल्याने टपरी चालकाचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार
हा सर्व प्रकार एमआयडीसी रस्त्यावरील एका लॉजवर घडला आहे. बुधवारी सकाळी अल्पवयीन प्रेयसी आणि प्रियकर श्रीराम सुग्रीव गिरी हे दोघे वडगाव मावळ येथील निसर्गवारा लॉजवर गेले होते. काही तासानंतर अज्ञात कारणावरून श्रीराम गिरीने प्रेयसीच्या गळ्यावर, हातावर तसेच पोटावर ब्लेडने वार केले. यामध्ये प्रेयसी गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर आरोपी लॉजमधून बाहेर येऊन दुचाकीवरून पसार झाला. मात्र, अल्पवयीन मुलगी खाली येत नसल्याने लॉज कर्मचाऱ्यांनी खोलीत प्रवेश केला. तेव्हा तिचा खून झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा धक्कादायक.. नातेवाईकांच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलाचा खून करून मृतदेह दोन वेळा पुरला
घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आरोपी फरार झाल्याने सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खूनामागील कारण अद्याप अस्पष्ट असून, या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर करत आहेत.