पुणे - पुण्यात कुरीअरने चक्क तलवारी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातील डीटीडीसी कंपनीच्या कुरीअर सेवेच्या ऑफिसमध्ये तीन तलवारी पार्सल म्हणून आल्या होत्या. लुधियानाहून या तलवारी कुणीतरी पार्सल केल्याची प्राथमिक माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली आहे. पण या तलवारी कुणाच्या नावाने आल्या याचा तपास पोलीस करत आहेत.
काय आहे प्रकरण - काल दुपारी स्वारगेट येथील एका कुरीअरच्या ऑफिस मध्ये एक पार्सल आल पार्सल ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांना शंका आली. पार्सल हे पूर्णपणे पॅक केलं असल्यानं नेमकं काय वस्तू आहे हे कळत नव्हतं. मात्र कुरीअर कर्मचाऱ्यांना पार्सलबाबत शंका असल्यानं त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. त्यानंतर स्वारगेट पोलीस डीटीडीसी च्या ऑफिसला पोहोचले पार्सल उघडल्यानंतर धारदार तलवारी या पार्सलमध्ये असल्याचं पुढे आलं आहे.
पोलीस तपास सुरू - पुण्यात गेल्या वर्षभरापासून गुन्हे वाढलेले आहेत. दिवसाढवळ्या, भररस्त्यात कोयता, तलवारीने होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच पुण्यात थेट लुधियानाहून शस्त्र पोहोचत असतील तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती स्पष्ट होत आहे.त्यामुळे आता पार्सल व्यवस्थेवरही पोलिसांची बारीक नजर असणे महत्त्वाचं असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद मध्ये देखील अशीच घटना घडली होती मात्र त्या घटनेचा आणि पुण्यातील आजच्या घटनेचासंबंध त्या घटनेशी नाही अशी माहिती देतानाच आता या प्रकरणी सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती स्वारगेट पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली आहे.