पुणे - आघाडीला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे राज्यात सत्तेच परिवर्तन नक्कीच होईल. शरद पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. त्यामुळे विरोधक पवारांवर बोलत आहेत. पवार कोणाला आवडो किंवा न आवडो पण पवारांना दुर्लक्षित करून राजकारण करता येत नाही. तर विरोधकांचा जाहीरनामा हा गाजराचा पाऊस आहे. जाहीरनामा हा जुमला पार्ट 2 असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
खडकवासला मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या पदयात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही. सरकारने एवढा विकास केला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील नेते राज्यात कशाला आलेत, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. पंतप्रधानांच्या सभेला वृक्षतोड झाली, त्याचप्रमाणे आरे कॉलनीत वृक्षतोड झाली. सरकार पर्यावरणावर फक्त भाषणबाजी करत आहे. मात्र, कृतीत काहीच दिसत नाही सरकार पर्यावरणावर फसवणूक करत असून पर्यावरण विषयावर ते गंभीर नसल्याचा आरोप सुळेंनी केला.
विरोधकांचा जाहीरनामा हा गाजरांचा पाऊस आहे. निवडणूक आली की असाच पाऊस पडत असतो. सरकारने पंधरा लाखांच आणि नोकऱ्यांचा आश्वासन दिले होते. आता जाहीरनाम्यात पाच रुपय, दहा रुपयाचे थाळीच आश्वासन दिले जाते. मात्र, यापेक्षा वडापाव महाग आहे. त्यामुळे जाहीरनामा हा एक जुमला पार्ट टू असल्याचे आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.