पुणे - खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत आयुक्तांसह चर्चा केली. सुळे यांच्या मतदार संघातील मोठा भाग पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवादात अनेक प्रश्नांची उत्तरे देत सुळेंनी सुशांतसिंह प्रकरणावर बोलणे टाळले आहे.
हेही वाचा - रिया चक्रवर्तीसह चार जणांविरोधात एनसीबीने दाखल केला गुन्हा
यासह पुण्यात कोविडचा आलेख स्थिरावलाय. मात्र, धोका टळलेला नाही. त्यामुळे जिम, रेस्टोरंट्स, मंदिरे खुली करण्याबाबत परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर इम्तियाज जलील यांना मागणी करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. तर 'आज तारिख काय आहे?' असे विचारत मंदिरे सुरू होण्याबाबत धीर धरा अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अंतिम वर्षांच्या परिक्षेविषयी देखील सुळेंनी मौन कायम ठेवले. 'अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत मी सरकार बरोबर आहे, जी सरकारची भूमिका तीच माझी भूमिका असले, आता विषय न्यायप्रविष्ट आहे. फक्त तारीख आणखी पुढे ढकलायला नको' असा आशावाद सुळेंनी व्यक्त केला आहे.
राजू शेट्टींच्या आंदोलनावर बोलताना सुळे म्हणाल्या, 'राजू शेट्टी बारामतीत आंदोलन करतात हाच आमच्या सरकारमधील आणि आधीच्या सरकारमधील फरक आहे. आधीच्या सरकारमध्ये दडपशाही होती. राजू शेट्टी हे आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आहेत, यासह कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे.', असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हाणामारीची चौकशी व्हायला पाहिजे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - आवाजावरून कोरोना चाचणी..! मुंबईत १ सप्टेंबरपासून अभ्यास, अहवालानंतर वापर