पुणे - देशातल्या पहिल्या 'जेल टुरिझम'ला पुण्यातल्या येरवडा तुरुंग येथून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग म्हणून येरवडा तुरुंगाकडे पाहिले जाते. या तुरुंगाला तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत या तुरुंगाची बांधणी केली गेली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात या तुरुंगामध्ये भारताचे अनेक महान स्वातंत्र्य सेनानी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढताना या तुरुंगात बंदिस्त करण्यात आले होते.
गेनबा सोपानराव मोझे शाळेच्या विद्यार्थ्यांना तुरुंग पर्यटन करण्याची संधी-
आज 26 जानेवारी च्या निमित्ताने पुण्यातल्या येरवडा भागातील गेनबा सोपानराव मोझे शाळेच्या विद्यार्थ्यांना तुरुंग पर्यटन करण्याची संधी मिळाली. येरवडा जेल'च्या समोर अनेकदा जात येत असतो. या जेलच्या आत काय असेल याची उत्सुकता नेहमी असायची. मात्र या जेल पर्यटनाच्या निमित्ताने जेलच्या आत जाता आलं. याठिकाणी असलेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी आणि वास्तव्य केलेल्या ठिकाणांना भेट देता आली. याचं खूप अप्रूप वाटत असल्याचं विद्यार्थ्यांनी ई टीव्ही भारताशी बोलतांना सांगितले.
आतमध्ये जाऊन टिळक यार्ड, गांधी यार्ड पाहिला पुणे करार झालेले ठिकाण पाहिले ज्या झाडा खाली हा करार झाला ते झाड देखील अजून ही सुस्थितीत आहे. ते पहिले, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
येरवडा तुरुंगात अनेक स्वातंत्र्यवीरांना बंदिवास
राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस, सरोजिनी नायडू, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू अशा अनेक महान स्वातंत्र्य सेनानींनी या येरवडा तुरुंगात कारावास भोगला. तसेच, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला ऐतिहासिक पुणे करार देखील या येरवडा तुरुंगाच्या प्रांगणात झाला होता. या तुरुंगात महात्मा गांधींना बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. त्या बराकीसमोर असलेल्या झाडाखाली महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर सही केली होती.
ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या तुरुंगांचे पर्यटन
अशा ऐतिहासिक घटनांनी भारावलेल्या या येरवडा तुरुंगामध्ये आतापर्यंत सामान्य नागरिकांना प्रवेश नव्हता. मात्र, तुरुंगाचा एकंदरीत इतिहास पाहता या ऐतिहासिक वास्तू पाहण्याची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी, या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने 'तुरुंग पर्यटन' ही संकल्पना पुढे करत आजपासून यासाठी सुरुवात केली आहे.
हेही वाचा- केंद्र सरकारकडून राज्यघटनेच्या मुलभूत तत्वांना तिलांजली - थोरात